… म्हणून राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागत आहे; मुख्यंमत्री ठाकरेंचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन…’ असा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल केल्याची घोषणा केली. त्यानंतर मात्र पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्याटप्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, या मुलाखतीत त्यांनी लॉकडाउनसंदर्भात भाष्य केलं आहे.

“मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड, चंद्रपूरसारख्या ठिकाणाही पुन्हा लॉकडाउन करावा लागत आहे. तर अशाप्रकारे परत परत लॉकडाउन करण्याची वेळ का येत आहे?,” असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा विचार करताना आर्थिक आणि आरोग्यासंदर्भातील बाजूही लक्षात घेणं महत्वाचं असल्याचे सांगितले. “एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परत परत शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाहीय,” असं सांगत उद्धव यांनी सगळीकडेच वेळोवेळी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सूचित केलं.

“एका बाजूला लॉकडाउन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाउनने काय साधलं?, लॉकडाउन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाउनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी? जे आज सरकारच्या दारी येऊन बसले आहेत. दार उघडं म्हणून टाहो फोडत आहेत त्यांना इतकचं सांगेन की दारं उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?,” असा सवाल लॉकडाउनवरुन टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

मी लॉकडाउन उठवतोय असं कधीचं म्हणणार नाही
“मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाउन मी उठवतोय. नाही मी अजिबात असं म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड्या करत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असलं तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. या सर्वाचं तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे. ही तारेवरची कसरत आहे. करोनाबरोबर जगायला शिकायचं म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment