हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना फटकारले आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो.
ते पुढे म्हणाले, आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत. मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.