विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे तुफानी भाषण; ‘या’ मुद्द्यांवरून भाजपला झापले

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विविध विषयांवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणाच्या धाडी, हिंदुत्व, नवाब मलिक प्रकरण, आणि मुंबई महापालिका या सर्व मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली

नवाब मलिक प्रकरण-
आज भाजपवाले नवाब मलिक यांचा राजीनामा मागतात. आम्ही दाऊदची माणसं, भ्रष्टाचारी असं म्हणता. पण जर तुमचा पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. नवाब मलिकांचा राजीनामा तुम्ही मागता? पण काश्मीरात मेहबुबा मुफ्तीसोबत सरकारमध्ये तुम्ही बसला होता. ज्याने लोकसभेवर हल्ला केला त्या अफजल गुरूला फाशी देऊ नका असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. या विचारांची माणसं तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसला असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला आरसा दाखवला

ईडी कारवाईला मी घाबरत नाही- उद्धव ठाकरे
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या ईडी कारवाई वरूनही विरोधकांना सुनावले. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर महाराष्ट्रात सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून अंगावर काय येता? हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल समोर या, घरच्यांवर कसले आरोप करता? महाभारतातील श्रीखंडी होता त्यासारखं कशाला काम करता? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

फडणवीसांनी केंद्रीय तपास यंत्रणेत घ्यावे- मुख्यमंत्र्यांचा टोला

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. केंद्राने देवेंद्र फडणवीस यांना रॉ किंवा सीबीआयमध्ये घ्यायला पाहिजे. ईडीला तुम्हीच माहिती दिली. असं वाचलं मी ईडी आहे की घरगडी आहे हेच कळत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनाही टोला लगावला

हर्षवर्धन पाटील यांना टोला

पूर्वीचे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती. मग त्यांनी भाजपमध्ये जाऊन झोप लागायचं औषध घेतले. आणि त्यांना आता सुखाने झोप लागते. भाजपकडे अस कोणतं औषध आहे ? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबई वरून भाजपला सुनावलं-

रावणाचा जीव बेंबीत होता तसा काहींचा जीव मुंबईत अडकला आहे अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील विविध विकासकामांची यादी वाचून दाखवली. तसेच कोरोना काळात मुंबई मॉडल जगभरात प्रसिद्ध झालं आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलं. कोविडमधून बरे होतात. पण द्वेषाच्या कावीळ जरी झाली असेल तर त्याचा उपचार कोणत्या दवाखान्यात करता येत नाही. कावीळ झालीय. पण द्वेषाची कावीळ बरीच होऊ शकत नाही. त्याला काय करणार, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी फटकेबाजी केली.