हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्यावर निशाणा साधला तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच नवाब मलिक यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल करत मुख्यंत्र्यांनी आता मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा शेलार यांनी केला. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब यांनी मान्य केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे नवाब मलिक सांगत आहेत असेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला