हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | थप्पड मारण्याची भाषा कोणी करू नये. अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
लहानपणापासून माझं चाळीत येणं जाणं होतं. या चाळीचेभूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, हे स्वप्नात पाहिले नाही. माझ्यावर लोकांनी पुष्पवृष्टी केली. पण आम्ही लोकांच्या ऋणात आहोत. मुंबईने, मराठी माणसाने रक्त सांडलं आहे. स्वतःची हक्काची घरं झाल्यावर मोहाला बळी पडू नका” असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रहिवाशांना दिला