हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे.
या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची खातरजमा मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला मिळालेल्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल अॅड्रेसवरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेल्या आणि स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल अॅड्रेस तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे,” अशी प्रतिक्रिया यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा