सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरासह जिल्ह्यातील भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतुने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटूंबीयांनी पुष्कर मंगल कार्यालयात पुन्हा कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुष्कर कोव्हीड सेंटरमध्ये ३२ ऑक्सिजनयुक्त बेडसह ८० बेडचे केअर सेंटर पुन्हा एकदा रुग्ण सेवेसाठी सज्ज होत असून येत्या दोन दिवसात हे सेंटर चालू होणार आहे.
पुष्कर मंगल कार्यालय येथे कोव्हीड केअर सेंटर उभारणी करण्यात येणार आहे. या सेंटरची आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, डॉ. ऋतुराज देशमुख व मान्यवरांनी पाहणी केली. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे संपुर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह आपल्या सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोव्हीड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खाजगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावत आहेत. अशावेळी सातारा शहरातील तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांना दिलासा देण्यासाठी पुष्कर कोव्हीड सेंटरचा उपयोग होणार आहे.
साै. वेदांतिकराजे भोसले म्हणाल्या, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रशासन तसेच अधिकारी आपले काम करत आहे. आम्ही ऑक्सिजनयुक्त बेडचे सेंटर आम्ही सुरू करत आहोत. येथे कुठल्याही प्रकारचे जादा पैसे घेतले जाणार नाहीत. शासनाच्या नियमानुसार पैसे घेतले जातील. लोकांच्या सोयीसाठी हे सेंटर उभारत आहोत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा