दिलासादायक ! तब्बल 18 तासांच्या थरारानंतर मार्केट यार्डातील गव्याला जेरबंद करण्यात यश

सांगली | सांगलीतल्या मार्केट यार्ड मध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती भागात अलेल्या गव्याला पकडण्यात अखेर यश आले आहे. रात्री दीडच्या सुमारास या गव्याला सुस्थितीत पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात हलवण्यात आले. वनविभाग, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, डॉक्टर, प्राणिमित्र संघटना आदींच्या माध्यमातून सलग अठरा तास ही मोहीम सुरू होती. दरम्यान, गव्याला व्यवस्थितरित्या पकडून बाहेर सोडण्यात आल्याने नागरिकांनी आता निश्वास टाकलेला आहे.

कृष्णा नदीच्या पलीकडे सांगलीवाडीच्या शिवारात गेल्या तीन दिवसांपूर्वी दिसलेला गवा सोमवारी मध्यरात्री आयर्विन पूल ओलांडून सांगली शहरात आला आणि त्याने यंत्रणेची झोप उडवली. वन विभाग, पोलिस, प्राणीमित्र आणि माध्यम प्रतिनिधींनी गणपती मंदिर ते वसंतदादा मार्केड यार्ड या गव्याच्या प्रवासाचा पाठलाग केला. गवा अचानक समोर आल्यानंतर अनेकांची भंबेरी उडाली. मार्केट यार्डमधील वेअर हाऊसमधील दोन मोठ्या इमारतींमध्ये तो अडकून पडला. त्यानंतर त्याला एकच खळबळ शहरात उडाली. त्या गव्याला रेस्क्यू करण्यासाठी मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन सुरू होते.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी राज्य शासनाने दिलेले वन्यजीव सुरक्षित वाहतूक वाहन यावेळी पाचारण करण्यात आले. या वाहनात खास जंगली जनावरांना सुरक्षितपणे नेण्यासाठी आवश्‍यक सुविधा आहेत. जनावरांनी वाहनात धडका मारल्या तरी त्याच्या शरिराचे तापमान वाढू नये, यासाठी पाणी फरावण्याची अंतर्गत सोय आहे. त्याला फिरायला फार जागा राहू नये, यासाठी छोटे दोन कप्पे केले आहेत. येथे वाहनातून प्रवासात गवा खाली बसला तरी त्याला जखम होऊ नये, यासाठी त्यात भुस्सा भरण्यात आला. निसर्गाचा फिल देण्यासाठी गाडीत कडबा आणि गवतही टाकण्यात आले होते.

अखेर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास छोट्याश्या बोळात वनविभागाने बोलेरो गाडी घालून गव्याला पुढे पुढे ढकलत आणले. त्यानंतर काही वेळातच गवा त्या व्हॅन मध्ये जाऊन बसला. तब्बल १८ तास सुरु असलेलं रॅक्यू ऑपरेशन संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून सुटकेचा आनंदोत्सव साजरा केला. वनविभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित सासणे, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, अजित उर्फ पापा पाटील यांच्यासह स्थानिक प्राणीमित्र मुस्तफा मुजावर, सचिन साळुंखे, कौस्तुभ पोळ, अमोल पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि पुण्यातील टीम ऑपरेशनमध्ये सहभाग होता.