औरंगाबाद – विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील नागरिकांना पोलीसांबद्दल काही तक्रार असल्यास औरंगाबादेत तक्रार नोंद करता येणार असून कायद्याप्रमाणे तक्रारींचे न्यायपूर्ण निरसन करण्यात येणार आहे. तक्रारी, समस्यांचा तत्काळ निपटारा झाल्याने पोलीस, नागरिक यांना न्याय व सुविधा मिळणे सुलभ होणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उद्घाटन डॉ.निखिल गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
रेल्वेस्थानक रस्त्यावरील महापौर बंगल्याशेजारील साई ट्रेड सेंटर येथील पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी डॉ. उन्मेष टाकळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश दे. ज. शेगोकार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) तथा सदस्य मीना मकवाना, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले की, पोलीस नेहमीच नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असतात. हे काम करतांना कधी कधी चुका होत असतात. त्याबद्दल तक्रारी निर्माण होऊन प्रकरणे न्यायालयातही जातात. अशा सहज सुटणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्या आता या प्राधिकरणाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष शेगोकार यांनी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकारणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या न्याय निवाड्याची प्रक्रिया समजावून सांगितली.