सातारा| येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रिडर्स क्लब आयोजित युवा काव्य संमेलनाचे उदघाटन करताना काव्य प्रतिभेचे वरदान लाभलेल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना कवितेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्राचार्य डॉ बी.टी. जाधव यांनी केले. इंग्रजी विभागाच्या रिडर्स क्लबने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.शशिकांत शिंदे यांनी ओव्या, अण्णाभाऊ साठे यांच्या कवितांचे दाखले देत एखाद्या कवीची कविता आयुष्य कसे बदलून टाकते हे उलगडून दाखवले. कविता जगायला कशी लावते हे त्यांनी स्वतःच्या कविता सादर करून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या युद्ध व शांतता, निसर्ग, तरुणाई, आई, स्वातंत्र्याची ७५ वर्षे इत्यादी विषयांवर इंग्रजी आणि मराठी भाषेत स्वरचित कविता सादर केल्या. समीक्षा जाधव हिने आपल्या आईला गमावल्याची वेदना तिच्या कवितेतून व्यक्त केली .
वैष्णवी मोरे हिने चहा या सर्वांना प्रिय असणाऱ्या अमृततुल्य पेयावर कविता सादर केली. मैत्रीण दुरावल्यानंतरची वेदना साक्षी गायकवाड हिने कवितेतून सादर केली. नितीन बोरुडे याने दूर असलेल्या आईच्या आठवणी आपल्या कवितेतून जाग्या केल्या. काजल सावंत हिने ‘किंमत’ तर आकाश थिटेने मला वाहत रहायचं आहे ही सामाजिक विषयावरील कविता सादर केली. अपेक्षा कदम हिने निसर्गावरील strolling by the garden , सुजाता सरोळकर निसर्ग, अक्षदा कणसे हिने तरुणाई ही कविता सादर केली. प्रा. प्रियांका काशीद यांनी ‘ एकदा काहीतरी बनायचं आहे’ ही कविता सादर केली.
विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा काव्यप्रतिभेचे वरदान मिळालेले असते. आणि या काव्यप्रतिभेचे सादरीकरणासाठी या युवा काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा. पार्थ यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले. कार्यक्रमाचा समारोप गणेश चिंचकर यांनी गायलेल्या ‘उत्तुंग आमुची सीमा’ या देशभक्तीपर गीताने झाला. यावेळी प्रा. सचिन लवटे, प्रा. राहुल वाघमारे, प्रा.सोनल कोल्हे, प्रा. प्रियांका काशीद या उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अपेक्षा कदम हिने मानले तर सूत्रसंचालन सोनाली घोरपडे हिने केले. महाविद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी सायली शिंदे , दिव्या शिंदे, पियुषा राजगुरू, प्रविण कोळपे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.