शहरात लग्नसमारंभाना पुन्हा सशर्त परवानगी, केवळ ५० व्यक्तींना परवानगी

औरंगाबाद | कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लग्नसमारंभावर बंदी आणली होती. मात्र यामुळे मंगल कार्यालय चालक आणि त्या संबंधित इतर व्यवसायांचे अतोनात नुकसान झाले. त्याकारणाने विवाह संघर्ष समितीने आ. प्रदिप जैस्वाल यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले होते. या पार्श्वभूमीवर जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांची भेट घेऊन विवाह संघर्ष समितीचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आता लग्न समारंभांना ग्रीन सिग्नल दिला आहे.

काही दिवसांपूर्वी विवाह संघर्ष समितीने आ. प्रदीप जैस्वाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंगल कार्यालय चालक, लग्न समारंभ यांच्याशी निगडित व्यवसायांना होणाऱ्या नुकसानाबाबत माहिती दिली होती. लग्न समारंभच बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे लग्नसमारंभावर लावण्यात आलेली बंदी हटविण्यात यावी. कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जाईल अशी विनंती त्यांनी जैस्वाल यांना केली होती.

त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेत विवाह संघर्ष समितीच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी सशर्त अटींसह लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत आता लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे.

You might also like