नवी दिल्ली | पॉक्सो कायद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गाणेडीवाल यांनी दिलेल्या निर्णयावर मध्यंतरी बराच वाद झाला. या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती गाणेडीवाल यांनी असे म्हटले होते की, ‘मुलीने कपडे घातले असताना तिच्या छातीला स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही’. त्यांच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक कायदे तज्ञांनी आणि सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयावर टीकाही झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. आता एका महिलेने त्यांच्या या निर्णयाचा निषेध म्हणून न्यायाधीश पुष्पा गाणेडीवाल यांच्या पत्त्यावर 150 कंडोम पाकिटे पाठवली असून, त्याचे कारणही सांगितले आहे.
अहमदाबादच्या देवश्री त्रिवेदी यांनी ही पाकिटे पाठवली आहेत. यासोबत त्यांनी म्हटले आहे की, ‘न्यायाधीश पुष्पा यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये ही कंडोम पाकिटे पाठवले आहेत’. यासोबतच देवश्री यांनी म्हटले की, ‘न्यायाधीश पुष्पा यांच्या मते त्वचेला स्पर्श केला नाही तर, लैंगिक शोषण होत नाही. आणि कंडोमचा वापर केल्यास त्वचेला स्पर्श होत नाही. तर याला काय म्हटले जाईल?’ यासोबतच त्यांनी एक पत्रही न्यायाधीशांना पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी न्यायाधीश पुष्पा यांच्या निलंबनाची मागणी देखील केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयमध्ये न्यायाधीश गाणेडीवाल या अतिरिक्त न्यायाधीश आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन निर्णय दिले होते. यावर मोठा वाद निर्माण झाला होता. 20 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायाधीश पुष्पा यांची उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी शिफारस केली होती. वादग्रस्त निर्णयानंतर ही शिफारस मागे घेण्यात आली होती. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.