हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डीएपी खतांच्या बाबतीत दरवाढीची समस्या निर्माण होण्यास तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे सरकारच कारणीभूत आहे. असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मोदींनी आता जुन्या दरातच रासायनिक खते उपलब्ध करून दिली आहेत त्यामुळे आता राज्यातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील त्या सरकारने ‘न्यूट्रियंट बेस्ड सबसिडी पॉलिसी’ नावाचे धोरण फॉस्फॅटिक आणि पोटॅशिक खतांसाठी १ एप्रिल २०१० पासून लागू केले. त्यानुसार केंद्र सरकारने डीएपीसारख्या खतांसाठीचे अनुदान मर्यादित ठेवावे आणि कंपन्यांना खतांच्या विक्री किंमती ठरविण्याची मोकळीक द्यावे असे धोरण लागू झाले. परिणामी कंपन्यांना दरवाढीला मोकळे रान मिळाले.
आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फॅरिक ॲसिड, अमोनिया आदी रसायनांच्या किंमती वाढल्याने खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी खताच्या किंमतीत वाढ केली. त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खतासाठीचे अनुदान १४० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना या खताच्या गोण्या गेल्या वर्षीच्याच भावाने मिळणार आहेत. कंपन्यांनी भाववाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत होते. आता मोदी सरकारने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल या पक्षांनी सरकारचे आभार मानावेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.