हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक वृत्तपंत्रात ही जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली असून यामध्ये २६. १ % जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे असा दावा करण्यात आला आहे. यानंतर या सर्वेवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी जोरदार टीका केली आहे. २०२४ नंतर एक होते शिंदे ही स्टोरी महाराष्ट्रात लिहिली जाईल असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले, गुण नाही पण वाण लागला आणि ढवळ्या बाजूला पवळ्या बांधला अशी शिंदे फडणवीस सरकारची केंद्रासोबत दोस्ती आहे. आता सकाळचा पण १ सर्वे आलाय कि शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ५ % मते मिळतील. अशावेळी आपणच एक सर्वे करायचा आणि कशी मला जनतेची पसंती आहे हे दाखवून देण्याचा हा खोटा प्रयत्न आहे. २०२४ मध्ये महाविकास आघाडी लोकसभेत ४२ पेक्षा जास्त आणि विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल. २०२४ नंतर एक होते शिंदे ही स्टोरी महाराष्ट्रात लिहिली जाईल असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला.
नेमकी काय आहे जाहिरात-
शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या जाहिरातीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” असं लिहिण्यात आलंय. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे. या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३०. २% आणि शिवसेना १६. २ % कौल म्हणजेच महाराष्ट्रातील ४६. ४ % जनता पुन्हा एकदा युतीला सत्तेवर आणण्यास इच्छुक आहे असे सदर जाहिरातीत म्हंटल आहे.
या जाहिरातीत मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणाची आकडेवारीचाही दावा करण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्र्रातील २६. १ % जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे तर २३. २ % लोकांना देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे असा दावा करण्यात आलाय. म्हणजेच फडणवीसांपेक्षा शिंदे वरचढ ठरल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे भाजपचे या सर्वेक्षणावर काय मत आहे ते सुद्धा पाहावं लागेल.