हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक वृत्तपंत्रात ही जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे यावर काय मत आहे हे आता पाहावं लागेल.
नेमकी काय आहे जाहिरात-
या जाहिरातीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. वरच्या बाजूला मोठ्या अक्षरात “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” असं लिहिण्यात आलंय. नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळालं आहे. या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३०. २% आणि शिवसेना १६. २ % कौल म्हणजेच महाराष्ट्रातील ४६. ४ % जनता पुन्हा एकदा युतीला सत्तेवर आणण्यास इच्छुक आहे असे सदर जाहिरातीत म्हंटल आहे.
या जाहिरातीत मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणाची आकडेवारीचाही दावा करण्यात आलाय. यामध्ये महाराष्ट्र्रातील २६. १ % जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे तर २३. २ % लोकांना देवेंद्र फडणवीस याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे असा दावा करण्यात आलाय. म्हणजेच फडणवीसांपेक्षा शिंदे वरचढ ठरल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे भाजपचे या सर्वेक्षणावर काय मत आहे ते सुद्धा पाहावं लागेल.