सांगली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सांगली महानगरपालिकेची महासभा ऑफलाईन घेण्यात आली होती. या महासभेत मागील ऑनलाइन महासभेत आलेल्या विषयाच्या मंजुरीवरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभा सुरू होताच दफन भूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरवरून जोरदार गदारोळ घालण्यास सुरवात केली. या गदरोळातच महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विषयाला मंजुरी दिला. यावेळी संतप्त झालेल्या महिला नगरसेवकांनी महापौराचा राजदंड पळवला तर इतर नगरसेवकांनी महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना घेराव घालून धक्काबुक्की केली. महापौर महासभेतून पळून गेल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी यावेळी केला.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे महापालिकेची महासभा हि ऑनलाईन घेण्यात येत होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही झाल्याने तब्बल दोन वर्षानंतर महापालिकेची महासभा हि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत मागील १८ फेब्रुवारीच्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यास कॉग्रेस व भाजपचे सदस्य विरोध करणार होते. १८ फेब्रुवारी रोजी पालिकेची ऑनलाईन सभा बोलविण्यात आली होती. मात्र ही सभा ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी कॉग्रेस व भाजपने या सभेवर बहिष्कार टाकला. पण महापौर सुर्यवंशी यांनी रेटून सभेचे कामकाज पूर्ण केले. या सभेला कोरम नसल्याने ही सभा बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी या मागणीसाठी कॉग्रेस व भाजप नगरसवेकांनी जिल्हाधिकारी, आयुक्तांना निवेदन दिले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2143885935793895/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing
महापौर सुर्यवंशी यांनी सभेला सुरवात झाली तेव्हा कोरम होता. त्यामुळे सभा कायदेशीर असल्याचा दावा केला. दरम्यान या सभेविरोधात काही नगरसेवकांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने याप्रकरणी आधी राज्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करा असे सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास महासभेला सुरवात झाली. सभेला सुरवात होताच काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी दफन भूमीच्या पॉईंट ऑफ ऑर्डरवरून महापौरांना घेरण्यास सुरवात केली.
१८ फेब्रुवारीच्या ओनलाईन सभेत मंजूर झालेल्या विषयांची चर्चा करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात केली. याला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह महापौरांनी विरोध केला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. या गोंधळातच महापौरांनी पॉईंट ऑफ ऑर्डरला मंजुरी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठाकडे धाव घेत राजदंड पळविला. महापौरांनी महासभेतून काढता पाय घेतला असता संतप्त नगरसेवकांनी त्यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करत धक्काबुक्की केली. अचानक उडालेल्या या गोंधळामुळे महासभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.