हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय असल्याचे म्हंटल आहे.
एका राज्यापुरता मर्यादीत असलेला राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असेही ते म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?
भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचं ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत. ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, “काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला होता.