भारत जोडो यात्रेत चालताना काँग्रेस खासदाराला आला हार्टअटॅक; उपचारादरम्यान मृत्यू

Santosh Singh Chaudhary Bharat Jodo Yatra Congress Punjab Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. त्यांची हि यात्रा अंतिम टप्प्यात आली असताना आज भारत जोडो यात्रेत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखून हार्ट अटॅक आला. कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.

काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांचा फगवाडा येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करून दिली. तसेच त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी या घटनेबद्दल ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.

https://twitter.com/puneet_banga/status/1614114512323629057?s=20&t=Aq34b2X824MQkMSTAppiUA

भारत जोडो यात्रा तात्पुरती स्थगित

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फिल्लोर येथील भट्टिया पर्यंतची यात्रा पूर्ण केली. त्या ठिकाणी काही काळ थांबा घेण्यात आला. मात्र, संतोष सिंह यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडताच त्यांनी प्रमुख काँग्रेस नेत्यांसोबत रुग्णालाय गाठले. तसेच भारत जोडो यात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.

कशी घडली ही घटना?

सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये आहे. आज लुधियानातील लाडोवाल टोल प्लाझा येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. ती फगवाड्याच्या दिशेने जात होती. यात्रेत 76 वर्षाचे असलेले खासदार संतोष सिंह चौधरी हे राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते. मात्र, सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागले. यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.