हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा आज केली. त्याबाबत काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाची मागणी करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच मोदींनी हा निर्णय घेतला. निवडणुका, सत्ता टिकवणे हेही महत्वाचे कारण आहे. पण शेतकऱ्यांना, अन्नदात्यांना देशद्रोही, खालिस्तानी म्हणल्याबद्दल मोदींनी देशाची माफी मागावी, असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद सांडत मोदींवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मोदींनी घेतलेल्या निर्णयामागे पंजाब व उत्तर प्रदेशातील निवडणुकाच कारणीभूत आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकामुळेच हा निर्णय घेतला. देशावर लादले गेलेल्या कृषी विषयक कायद्याच्या रद्द झालेल्या आध्यादेशांनाही पंतप्रधान मोदी यांनी त्वरीत मान्यता द्यावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
देशातील शेतकऱ्यांचा हा मोठा विजय आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात, लोकशाहीत महत्त्वाची घटना म्हणून याची नोंद घ्यावी लागेल. पण, मोदी फक्त निवडणुकीचा जय-परायज डोळ्यापुढे ठेवूनच निर्णय घेतात. झालेल्या पोट निवडणुकांमध्ये मोदींच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत म्हणून त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. आता यूपीमध्ये निवडणुका आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी कायदे रद्द करण्यामागे निवडणुका, सत्ता टिकवणे एवढेच कारण असल्याचेही यावेळी चव्हाण यांनी सांगितले.