हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कोणी काय बोलेल याचा काही नेम नाही. निवडणुकीत आपल्याया पक्षाला विजय करण्यासाठी मतदारांना अनेक प्रकारच्या ऑफर सध्या दिल्या जात आहेत. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना एक ऑफर दिली आहे. त्यांच्या या ऑफर्सवर “जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे?” असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पाटलांना करीत टोला लगावला आहे.
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी प्रचारा दरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिल्याचे समजले. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असे ते म्हणाले. पाटलांनी एक गोष्ट सांगावी कि जेवण एक दिवस देणार आहात की उर्वरीत तीन वर्षे?”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेक निवडणुकीत मतदारांना अनेक प्रकारच्या अशा पद्धतीच्या ऑफर दिलेल्या आहेत. त्यांनी सांगलीतही अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले होते. त्यानंतर आता पाटलांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या प्रचारावेळी गावजेवणाची ऑफर दिली आहे.