ही तर शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन आपल्या उद्योजक मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण शेतकऱ्यांचे किती कैवारी आहेत हे दाखवण्यासाठी इव्हेंटबाजी करत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये देण्याची ही योजना म्हणजे शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन आपल्या उद्योजक मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

थोरात पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या वार्षीक ५४ हजार कोटी रुपयांसाठी सरकार कर्ज काढते. शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये म्हणजे दिवसाला १७ रुपये आणि महिन्याला ५०० रुपये होतात. परंतु ९ कोटी शेतकऱ्यांसाठी ५४ हजार कोटी रुपये देणाऱ्या मोदी सरकारने २०१५ ते २०१९ या कालावधीत मूठभर उद्योगपतींचे तब्बल ७,९४,३५४ कोटी रुपयांचे कर्ज (जवळपास ८ लाख कोटी रुपये) राईट ऑफ केले. दुसरीकडे मोदी सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये आतापर्यंत २५ रुपयांची वाढ केली, खतांच्या किमती वाढवल्या, एमएसपी बंद केली जात आहे, सबसीडी बंद केली. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हेक्टरी ३० हजार रुपये होता त्यात आज मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे वर्षाला ६ हजार रुपये दिले तरी २४ हजार रुपयांची तफावत आहे.

शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असून शेतकरीही मागे हटण्यास तयार नाहीत हे दिसताच या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तसेच नवीन कृषी कायदे किती फायद्याचे आहेत हे वदवून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांना सहभागी करुन आज इव्हेंट केला गेला, असे थोरात म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’