‘नितीशजी भाजप आणि संघाला सोडून तेजस्वी यादवांना आशीर्वाद द्या!’; काँग्रेस नेत्याची सत्तास्थापनेची ऑफर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केलेय. नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीला पायबंद घातला पाहिजे. त्यामुळे तुम्ही समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या पक्षांसोबत आले पाहिजे. यावर जरुर विचार करा, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. (Congress leader Digvijay Singh offer to Nitish Kumar)

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अमरवेलीप्रमाणे आहेत. ज्या झाडावर ही वेल लपेटली जाते ते झाड सुकून जाते आणि ही अमरवेल वाढत जाते. ही अमरवेल बिहारमध्ये वाढून देऊ नका. तुम्ही लालू प्रसाद यादव यांच्यासोबत अनेक आंदोलने आणि संघर्ष केलाय. त्यासाठी तुम्ही एकत्र तुरुंगातही गेला आहात. त्यामुळे आता भाजप आणि संघाची ही विचारधारा सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

तुम्ही महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे नेते आहात. जनसंघातही द्विराष्ट्रवादाच्या मुद्द्यावरच फूट पडली होती. त्यामुळे आता तुम्हीही संघ आणि भाजपची साथ सोडा. देशाला बरबाद होण्यापासून वाचवा, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले. यामध्ये नितीश यांच्या संयुक्त जनता दलाच्या (JDU) अवघ्या 43 आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी काळात नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा राहील, हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment