पुणे प्रतिनिधि | नोटबंदीमध्ये कमावलेला पैसा भाजप आमदारांच्या खरेदीसाठी वापरत आहे असा खळबळ जनक आरोप कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. ते पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्रात आले असता पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकच्या आमदारांचा भाजपने घोडे बाजार केला असा बेछूट आरोप करत दिग्विजयसिंह यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीत दिग्विजय सिंह यांना भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकी बद्दल विचारले असता दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह उभा केले. भाजप विजयाचे जे आकडे सांगते ते आकडे नेहमीच कसे खरे होतात. याचा अर्थ काय? ईव्हीएम मशीनमध्ये निश्चितच गडबड असणार. भाजप सरकार खोटी आश्वासने देण्यात नेहमीच अग्रेसर असते. भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची होणार हे देखील त्यातीलच एक आश्वासन आहे. या वर्षी मांडलेल्या दोन्ही अर्थसंकल्पात १ कोटी ७० लाखांचा फरक कसा याचे उत्तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी द्यावे असे दिग्विजय सिंह यांनी म्हणले आहे.
दिग्विजय सिंह एवढेच बोलून थांबले नाहीत. पुलवामा हल्ल्याची पूर्व कल्पना गुप्तचर खात्याने दिली असताना देखील सरकारने काहीच खबरदारी घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा राहते असे दिग्विजय सिंह यांनी म्हणले आहे.