संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेस नेते संतापले, माफी मागण्याचे केले आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । काल पुण्यातील एका कार्यक्रमात दिलेल्या जाहीर मुलाखतीत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केलं होत. या विधानानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. संजय निरुपम आणि मिलिंद देवरा या मुंबई काँग्रेसच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी संजय राऊत यांनी माफी मागावी म्हणून ट्विटरवर आवाहन केल आहे.

काल पुण्यात एका कार्यक्रमात मुलाखत देताना संजय राऊत म्हणाले होते कि, ‘मुंबईचा माफिया डॉन असलेल्या करीम लाला याला भेटण्यासाठी काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी या देखील येत असत’. राऊत यांच्या याच विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. इंदिरा गांधी यांच्याबाबत संजय राऊत यांनी असे वक्तव्य करणे गैर असून, आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि त्याबाबत त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसचे नेते करू लागले आहेत.

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत कधीही तडजोड केली नाही. खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेले चुकीचे वक्तव्य मागे घ्यावे असे मी माजी मुंबई काँग्रस अध्यक्ष या नात्याने त्यांना आवाहन करतो, असे मिलिंद देवरा यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत त्यांची खिल्ली उडवत त्यांचा निषेध केला आहे. अशी वक्तव्ये करणाऱ्या संजय राऊत यांना त्यांनी ‘मिस्टर शायर’ असे म्हटले आहे. मिस्टर शायर (संजय राऊत) यांनी दुसऱ्यांच्या हलक्या-फुलक्या कविता ऐकवून महाराष्ट्राचे मनोरंजन करत राहावे हे चांगले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात राऊत हे अपप्रचार करत असतील तर त्यांना नक्कीच पश्चातापाची पाळी येईल. इंदिरा गांधी यांच्याबाबत काल त्यांनी केलेले वक्तव्य त्यांनी मागे घ्यावे, असे आवाहनही निरुपम यांनी राऊत यांना केले आहे.

 

Leave a Comment