हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने राज्यातील 23 जागांवर दावा केला आहे. या दाव्यामुळे सध्या महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, आघाडीत जागा वाटपासंदर्भात वाद निर्माण झाला असताना काँग्रेस नेते संजय निरुपम ठाकरे गटात संदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “ठाकरे गट लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकू शकणार नाही” असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
ठाकरे गटाला डिवचत निरुपम म्हणाले की, “ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा निवडून आणू शकत नाही. माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वबळावर एक तरी जागा निवडून आणून दाखवावी. ठाकरे गटाने गेल्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापैकी अर्धा डझन खासदार पळून गेले आहेत. आता त्यांच्याकडे चार किंवा पाचच खासदार उरले आहेत. तेही त्यांच्याकडे राहणार की नाही याची गॅरंटी नाही”
त्याचबरोबर, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात विचारले असताना, “अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे. जर निमंत्रण आलं तर मी नक्कीच जाणार. निमंत्रण नाही मिळालं तर 22 जानेवारीनंतर जाणार” असे निरुपम यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट जोरदार तयारीला लागला असताना संजय निरुपम यांनी ठाकरे गटाला स्वबळावर जागा जिंकण्याचे चॅलेंज केले आहे. त्यावर आता ठाकरे गट काय प्रत्युत्तर दिलं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.