Saturday, March 25, 2023

राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडलेली आहे. एकीकडे औरंगाबादच्या नामांतरासाठी शिवसेनेकडून हालचाली सुरू असतानाच सत्तेतील वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये औरंगाबादच्या नामांतरावरून पुन्हा मतभेद समोर आले आहेत. त्यातच आता मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले.

संजय निरुपम यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून निरुपमांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

- Advertisement -

काँग्रेस नेत्यांची संभाजी महाराजांवर अधिक श्रद्धा असणार – संजय राऊत

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शहराच्या नावावर काही मतभेद असूच शकत नाही. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवरच जास्त श्रद्धा असणार यात शंका नाही, असं राऊत म्हणाले. बाबर आपला कोणीच लागत नाही. पण प्रत्येक हिंदुंची संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे, असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’