हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपने ठिकठिकाणी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तर 15 ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले, राज्य सरकारनं कोणत्याही धर्माच्याबाबतीत भेदभाव केलेला नाही. भाजपकडून जाणूनबुजून हिंदू-मुस्लिम वाद लावून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ईदच्यावेळीही बंधनं आणली होती. बकरी ईदच्या वेळी मुस्लिमांमध्येही रोष निर्माण झाला होता. पण राज्य सरकार नरमलं नाही. त्यांना प्रतिकात्मक कुर्बानी देण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. मानवतेला कलंक लावण्याचं पाप भाजप सातत्याने करत आहे. ते त्यांनी बंद करावं, असंही ते म्हणाले.