हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि शशी थरूर यांच्यात मुकाबला होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. राहुल गांधी यांनी यापूर्वीच आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी नकार दिल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केलं . पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती मी पार पडेन असं त्यांनी म्हंटल. यासाठी ते राजस्थानचे मुख्यमंत्री पदही सोडणार आहेत. गहलोत यांच्याशिवाय शशी थरूर, मनीष तिवारी आणि दिग्विजय सिंह हे सुद्धा अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.