काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पहा कधी होणार मतदान

Rahul and sonia gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपद बदलाच्या चर्चा सुरु आहेत. यासाठीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार,17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निवडणुकीसाठीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर असेल. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाईल आणि नव्या अध्यक्षाची घोषणा केली जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी परदेशातुन सहभागी झाले होते. या व्यतिरिक्त हरीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेते या बैठकीत काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.

असा असेल काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम –

22 सप्टेंबर – अधिसूचना
24 सप्टेंबर – नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख
30 सप्टेंबर – नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख
17 ऑक्टोबर – मतदान
19 ऑक्टोबर – मजमोजणी

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष राहिल्या आहेत. राहुल गांधी पुन्हा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उत्सुक नाहीत अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर दिसत आहे.