राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा” असं म्हटलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राहुल यांनी हे ट्विट केलं आहे. “मी जगातील कोणालाही घाबरणार नाही. मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन. गांधी जयंतीच्या शुभेच्छा” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीवर विरोधकांनीही योगी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार” आहे असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीने वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे? हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे” अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment