हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रमंच च्या नेत्यांची बैठक पार पडली. देशात भाजप विरोधी गट एकत्र आल्याच्या बातम्या जोरदार पसरल्या. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून सविस्तर भाष्य केले. पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी ‘राष्ट्रमंच’वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही असं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं आहे. तसेच शरद पवारांच्या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे असेही शिवसेनेने म्हंटल.
शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 ‘जनपथ’ या निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’ नामक विरोधी पक्ष गटाची एक बैठक झाली. बैठक अडीच तास झाली असे म्हणतात. या बैठकीचा बराच गाजावाजा ‘मीडिया’ने केला. अर्थात बैठकीआधी हा ‘राष्ट्रमंच’ जेवढा गाजला तेवढे त्याच्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याचे व्हिजन सरकारकडे नाही. सरकारला ते व्हिजन वगैरे देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच कोरोना संकट, वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांवर विचारमंथन झाले. म्हणजे नक्की काय झाले? पवारांच्या ‘6 जनपथ’वर हे जे लोक जमले ते राजकीय कृतीपेक्षा विचार मंथनावर भर देणारे होते. पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला. त्याचा फक्त आस्वाद घेण्याचे काम पवार यांनी केले. कारण नंतरच्या पत्रकार परिषदेत पवार उपस्थित राहिले नाहीत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
गेल्या सात वर्षांत विरोधी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व अजिबात दिसत नाही. अनेक मोठय़ा राज्यांतील प्रादेशिक पक्ष व त्यांच्या नेत्यांनी भाजप किंवा मोदी-शहा यांच्या ताकदीचा प्रतिकारही केला व विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही केला. प. बंगालात ममता बॅनर्जी, तामीळनाडूत स्टॅलिन, बिहारात संघर्ष करून भाजप-नितीश कुमारांना जेरीस आणणारे तेजस्वी यादव, तेलंगणात चंद्रशेखर राव, आंध्रात चंद्राबाबू, जगन मोहन, केरळात डावे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेस यांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने भाजपला रोखले तेच खरे विरोधी पक्षांचे विचारमंथन आहे. पण कालच्या दिल्लीतील मंथनात यापैकी एकही पक्ष किंवा नेता हजर नव्हता,” असं शिवसेनेने म्हंटल आहे.
पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीची राहिलेली नाही. ती घसरली आहे, पण त्या घसरलेल्या जागेवर सध्याचा विरोधी पक्ष वाढतोय, रुजतोय असे दिसत नाही. . खरे म्हणजे काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे. तरच विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीला खरे बळ प्राप्त होऊ शकेल,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.