हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना पुण्यात मात्र माविआ मध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पुण्यात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कोअर कमिटीची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नसल्याने आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले. त्यानंतर ही निवडणूक स्वबळावर लढण्यास एकमत झाले. तसेच या निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी, अशी सूचनाही कार्यकर्त्यांना पक्षाकडून देण्यात आली.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. आधीच शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्याने विरोधकांनाही ताकद वाढली आहे. त्यातच आता काँग्रेसच्या या निर्णयानंतर काँग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका काय असेल ते आता पाहावं लागेल.