देशात सत्तांतराला सुरवात; हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस विजयी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये मात्र हातची सत्ता गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवत भाजपला धोबीपछाड दिला आहे. खरं तर हिमाचल प्रदेश हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या राज्यातच भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा 35 जागांची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसने हिमाचल प्रदेशात 40 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता काबीज केली आहे. तर भाजपची मजल अवघ्या 25 जागांपर्यंतच गेली. हिमाचल प्रदेश मध्ये 3 अपक्षांनी सुद्धा विजय मिळवला. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशात आपले खातेही उघडता आले नाही.

हिमाचल प्रदेशामध्ये प्रत्येक निवडणुकीत सत्तांतराची परंपरा

हिमाचल प्रदेशात प्रत्येक निवडणुकींनंतर सत्तांतर होते. तेथील जनतेला हि परंपरा यंदाही पाळत सत्तांतर घडवले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिमाचल प्रदेशामध्ये ४४ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र आता अवघ्या २५ जागांवर विजय मिळवता आल्यामुळे भाजपचे तब्बल १९ जागांचे नुकसान झालं आहे . जयराम ठाकूर यांच्या मंत्रिमंडळातील 10 पैकी 8 मंत्र्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. यामध्ये सुरेश भारद्वाज, रामलाल मार्कंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकूर, राकेश पठानिया, डॉ. राजीव सैजल, सरवीन चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशच्या निकालामुळे देशात सत्तांतराला सुरुवात झाली असून मोदी लाट ही फक्त गुजरातपुरतीच मर्यादित होती हे सिद्ध झाले आहे.