औरंगाबाद – शहरातील ऐतिहासिक मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अभियानातून सुमारे 38 लाख रुपये खर्च करून या दरवाजाला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. चार महिन्यात नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्वात जुन्या मेहमूद दरवाजाचे काम रखडले होते. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर डागडुजीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरवाजाच्या ज्या भागाची डागडुजी करता येऊ शकत नाही, तो भाग पाडून तेथे नवीन बांधकाम केले जाणार आहे. चारशे वर्षांपूर्वी दरवाजा बनवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली होती त्याच पारंपारिक पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी चुना, दगड, वीट यांचा वापर करण्यात येणार आहे.
यासाठी चुना भिजवण्यासाठी हौद देखिल तयार करण्यात आले आहेत. यासाठी स्मार्ट सिटीने एकूण 38 लाखांचे टेंडर काढले होते. चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण होईल. स्मार्ट सिटीच्या साहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, दरवाजाच्या नूतनीकरणाचे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. हा दरवाजा जीर्ण झाला होता. त्यामुळे दगड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन स्नेहा बक्षी यांनी केले आहे.