“पुणे मेट्रोत कोणतंही योगदान नाही म्हणून सीटवर का बसू असा प्रश्न पवारांना पडलाय का?”; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी तिकिट खिडकीवर जाऊन पवारांनी तिकीट घेतले. पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपाने निशाणा साधला आहे. “पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का शरद पवार साहेबांना?,” असा टोला भाजपाने पवारांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या मेट्रो स्थानकांच्या पाहणीवरून भाजपने पवारांवर ट्विट करीत निशाणा साधला आहे. भाजपाने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शरद पवारांचा मेट्रोतून प्रवास करत असतानाचा फोटो ट्वीट केला आहे. “पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणतंही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का शरद पवार साहेबांना?,” असा उपहासात्मक टोला भाजपाने लगावला आहे.

दरम्यान पवारांचा दौरा पूर्ण होताच भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकात पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. तसेच मेट्रोविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपाला मेट्रोकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही यावेळी पाटील यांनी केला आहे.