औरंगाबाद – दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. त्यामुळे ई-शॉपिंगला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. 50 ते 60 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे; तसेच अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणे यांसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसांत घरपोच मिळत आहेत. तसेच या वस्तूंमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा शंका असल्यास दहा दिवसांत ती वस्तू पुन्हा परत करता येत असल्याने ग्राहकांमध्ये ऑनलाइन खरेदी सुरक्षित बनली आहे. मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि सूट मिळत असल्याने खरेदीसाठी उत्तम पर्याय म्हणून ऑनलाईन शॉपिंग कपन्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दिवाळीतील भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपड्यांच्या ऍक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, टीव्ही, लॅपटॉप, खेळणी, दागिने, सौंदर्यप्रसाधने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
यात सर्वाधिक विक्री ही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स ऍक्सेसरीज, टीव्ही यासह इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होत आहे. यावर सुमारे 80 टक्क्यांपर्यंत सवलती दिल्या जात आहेत. दिवसातील अधिक वेळ तरुणाई इंटरनेटवर व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंगवर विशेष सवलती मिळत आहे. त्यामुळे घरबसल्या खरेदी करण्यात तरुणाईचा कल अधिक आहे.