अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावतीत एका धक्कादायक खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पूर्ववैमनस्यातून १ लाख २० हजार रुपयांची सुपारी घेऊन खून करत प्रेत पोत्यात टाकून नदीत फेकण्याची बाब समोर आली आहे.
अमरावतीच्या मंगरूळ दस्तगीर येथे १४ फेब्रुवारीला हनुमंत साखरकर यास उमेश सावलीकर यांनी मोबाईल फोनवरून त्याची मोटरसायकल पंचर झाली असल्याचे कारण सांगून निंबोळी गावाकडे बोलावले. निंबोळी गावाजवळील रोडवर राजू कावरे आणि आशिष ठाकरे यांनी हनुमंत साखरकर याला विद्युत वायर वापरून गळा आवळून मारून टाकले. यानंतर सोबत आणलेल्या पोत्यामध्ये साखरकर यांचा मृतदेह बांधून त्याच्याच मोटरसायकलवर ठेवून पुलगाव येथे रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान वर्धा नदीच्या पुलावरून टाकून देण्यात आला.
सदर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि मोबाईल फोनसुद्धा मृतदेहासोबतच फेकून देण्यात आला. त्यानंतर सदर आरोपी पायी चालत हिंगणगाव येथे परत गेले. पूर्ववैमनस्यातून सुपारी घेऊन हा खून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली. सदर दोन्ही आरोपीना मंगरूळ दस्तगीर येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक विश्वास वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे प्रभारी अधिकारी API सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली API नरेंद्र पेंदोर, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे, युवराज मानमोटे, आशिष बुंबरे व चालक नितेश तेलगोटे यांनी केली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.