Wednesday, October 5, 2022

Buy now

सोमवार पेठेतील मारहाणीत परस्परविरोधी तक्रारी, सात जणांवर गुन्हा दाखल

फलटण | शहरातील सोमवार पेठ परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेवरून परस्पर विरोधी तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अक्षय अमित पवार (वय-21 रा. सोमवार पेठ) आणि रोहित बाळू अवघडे (वय-20 रा. बिरदेवनगर, फलटण) या दोघांनी परस्परविरोधी पोलिसांत तक्रार दिलीआहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय पवार याने तक्रारीत म्हटले आहे की, गुरूवारी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते सोमवार पेठेतील बायपास रोडवरून बहिणीस दवाखान्यात घेऊन चालले होते. त्या वेळी त्यांना रोहित अवघडे (रा. बिरदेवनगर, फलटण) याने अडविले व विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तेथे मंगेश आवळे, आदित्य पाटोळे,(रा. सोमवार पेठ, फलटण) हे मोटारसायकलवर आले. रोहित अवघडे सोबत असणारे उमेश आवळे, राहुल म्हात्रे (दोघेही रा. सोमवार पेठ) या सर्वांनी पवार यास शिवीगाळ व मारहाण केली. यातील मंगेश आवळे याने पवार याच्या हातातील मोबाईल घेऊन खाली आपटून फोडला. यावरून पाच जणांविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस हवालदार फरांदे करीत आहेत.

याप्रकरणी रोहित बाळू अवघडे (वय-20 रा. बिरदेवनगर, फलटण) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास श्रीराम साखर कारखान्याच्या मेन गेट येथे अक्षय पवार (रा. सोमवार पेठ) व सौरभ जाधव (रा. गणेश शेरी, धुळदेव, ता. फलटण) यांनी अवघडे यास तू तुझ्या मोबाईलवर मंगेश आवळे यांचा स्टेट्स का ठेवतोस, असे विचारत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व उसाने मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केली. यावरून दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे करीत आहेत.