हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधीजींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आलेल्या कालिचरण महाराजाला जेलची हवा खावी लागली होती. आता त्याने पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवे. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत, असे विधान कालिचरणने केले आहे.
अलिगडमधील संत समागममध्ये नुकताच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कालिचरणने वादग्रस्त विधान केले. यावेळी कालिचरणने म्हटले आहे की, देशाला इस्लामकडे घेऊन जात आहेत. देशात 5 लाख मंदिरे तोडली आहेत आणि 800 वर्षात 80 हजार महिलांसोबत बलात्कार झाला आहे. जर हिंदू राष्ट्र बनले नाही तर अशा प्रकारच्या घटना या होतच राहतील. राजकीय इच्छाशक्तीतून हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते. इराक, इराण, अफगानिस्तान आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देश आपल्या हातातून गेले आणि मुस्लिम राष्ट्र झाल्याचा दावाही यावेळी कालिचरणने केला आहे.
महात्मा गांधीजींबद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य
कालिचरण महाराजाने डिसेंबर महिन्यात महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला तुरुंगवासही भोगायला लागला होता. गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्याने म्हटले होते की, मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. यानंतर अनेक ठिकाणी कालिचरण विरोधात गुन्हे दाखल झाले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती.
कोण आहे कालिचरण महाराज?
कालिचरण महाराजाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला होता. नावाने कालीचरण असणारा हा महाराज अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये ‘भावसार पंचबंगला’ भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. या महाराजाचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग आहे. पुढे अभिजीतचा ‘कालीपुत्र कालीचरण’ झाला. लोकांनी त्यांना ‘महाराज’ असे संबोधले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती.