नवी दिल्ली । भारताकडून वाढत्या दबावानंतर, ब्रिटनने शेवटी भारतात बनवलेली कोरोना लस कोविशील्डला मान्यता दिली आहे. यूकेने आपला निर्णय बदलून नवीन ट्रॅव्हल एडव्हायझरी जारी केली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनकडे कोविशील्डची मान्यता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की,” कोविशील्ड लसीला मान्यता न देणे हे भेदभाव करणारे धोरण आहे.” यानंतर ब्रिटनने ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या ब्रिटनच्या ट्रिपबाबत लाल, एम्बर आणि हिरव्या अशा तीन वेगवेगळ्या लिस्ट तयार करण्यात आल्या आहेत. धोक्यानुसार वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या लिस्टमध्ये ठेवण्यात आले आहे. 4 ऑक्टोबरपासून सर्व लिस्ट विलीन केल्या जातील आणि फक्त रेड लिस्टच राहिल. रेड लिस्टमध्ये समावेश असलेल्या देशांतील प्रवाशांना यूकेच्या प्रवासावर निर्बंध येतील. भारत अजूनही एम्बर लिस्टमध्ये आहे.
अशा परिस्थितीत, एम्बर लिस्ट काढून टाकणे म्हणजे फक्त काही प्रवाशांना PCR चाचणीतून सूट मिळेल. यूकेमध्ये कोविड -19 लस मंजूर होतील अशा देशांमध्ये भारताचा अद्याप समावेश नव्हता. याचा अर्थ असा की, ज्या भारतीयांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड लस घेतली आहे त्यांना PCR चाचणी करणे बंधनकारक असेल आणि नियुक्त केलेल्या पत्त्यावर क्वारंटाईन राहावे लागेल.
यापूर्वी सोमवारी ब्रिटनने म्हटले होते की,”भारतीय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कोविड -19 व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटला मान्यता देण्याबाबत भारताशी चर्चा सुरू आहे.” 4 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नियमांबाबत भारतातील चिंतांबद्दल विचारले असता, ब्रिटिश उच्चायुक्ताच्या प्रवक्त्याने सांगितले की,”यूके या विषयावर भारताशी चर्चा करत आहे आणि शक्य तितक्या लवकर आंतरराष्ट्रीय प्रवास पुन्हा सुरू करण्यास वचनबद्ध आहे.”