राज्यातील कोरोनाग्रस्तांनी गाठला १ लाखाचा टप्पा; दिवसभरात सापडले ३ हजार ७१७ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात अनलॉक केल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज १ हजार ७१८ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे.

राज्यात आज ३ हजार ४९३ रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १ लाख १ हजार १४१ झाली असली तरी आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेल्याने राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ६१६ एवढीच असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं.

राज्यात आज १२७ रुग्ण दगावले असून त्यात सर्वाधिक मृतांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आज ९०, ठाण्यात ११, कल्याण-डोंबिवलीत ३, वसई-विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत ३ आणि पुण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. आज दगावलेल्यांमध्ये ९२ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी ६७ रुग्ण ६० वर्षांवरील, ५२ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आणि ८ रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. तर ८९ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २, पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांपैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Comment