वानखेडेच्या पिचवर आता कोरोनाचा सामना; स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट कायम आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा संकटाचा सामना करण्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारणार येणार आहे. त्यादृष्टीने मुंबई महापालिकेने तयारी सुरु केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळं एरवी भारतीय संघ ज्या वानखेडे स्टेडियमवर प्रतिस्पर्धी संघांचा सामना करतो आता त्या मैदानात कोरोनाचा सामना होऊ शकतो.

दरम्यान, काल मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील विशेष कोविड रुग्णालयाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून पाहणी करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावातल्या कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची संकल्पना ठेवण्यात आली. बीएमसीने वानखेडे स्टेडियमवर कोरोनव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) वानखेडे स्टेडियमची काही सुविधा वापरण्याबाबत नोटीस बजावली आहे. ‘ए’ प्रभागातील सहाय्यक महानगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी जारी केलेल्या पत्रात “हॉटेल, लॉज, क्लब, कॉलेज, प्रदर्शन केंद्रे, वसतिगृह,विवाहगृह, जिमखाना, मेजवानी हॉल तातडीने देण्यात यावेत” अशी विनंती केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”