मुंबई । राज्याचा कोरोनाविरुद्ध लढा सुरुच असून राज्यात आतापर्यंत ७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात शुक्रवारी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत, असे ते म्हणालेत.
सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”