औरंगाबाद – मुलगा कोरोना आजारामुळे मृत झाला, असे पत्नी व गल्लीतील लोकांना सांगून त्याचा विधीवत दहावा व तेरावा केला. मात्र तोच मुलगा तीन महिन्यानंतर अचानक अवतरल्याने सावत्र पित्याची भंबेरी उडाली. हा प्रकार वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे काल उघडकीस आला आहे.
वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील ओमसाईनगरात राहणाऱ्या गोपाल सोनवणे (वय 50) याच्या दुसऱ्या पत्नीचा पहिल्या पतीपासून झालेला विनायक हा मुलगा गतिमंद आहे. कोरोना काळाचा फायदा घेत या गतिमंद मुलाला सावत्र पित्याने घाटीत नेऊन सोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. कोरोनाने मृत झालेल्याचा मृतदेह घरी देत नाही, असे पत्नी व गल्लीत सांगून मुलाचा विधीवत दहावा व तेरावा केला.
या घटनेला तब्बल तीन महिने उलटून गेले. मात्र याच गल्लीतील काही मुले घाटीत रिपोर्ट आणण्यासाठी गेले असता तो गतिमंद मुलगा तेथे त्यांना भेटला. हा मुलगा तर तीन महिन्यांपूर्वीच मृत झाला आहे, असे मनात विचार करत असतानाच त्याचा फोटो काढून मित्र व गल्लीत दाखवला. तो मृत असल्याचे सर्वांनी सांगितले. तरीही आपण खात्री करू, असे म्हणत अमोल शेवंतकर, शुभम दुसंगे, शेख हाफीस आणि संतोष पडघन हे त्याच्या वडिलांना घाटीत घेऊन गेले असता वडिलांना पाहून विनायक हा वडिलांच्या गळ्यात पडला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.