हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात जास्त करोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील वाढला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी जनतेशी लाईव संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्याला गाव कोरोनमुक्त करायचा आहे असं म्हटलं होतं. त्याच धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘कोरोना मुक्त गाव’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या गावांसाठी उत्तम बक्षीस देखील आयोजित केले आहे. प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये आणि 15 लाख रुपये बक्षीस दिले जाणार आहे. सहा महसूल विभागात प्रत्येकी तीन प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षिसे दिली जाणार आहेत. या बक्षिसाची एकूण रक्कम पाच कोटी 40 लाख रुपये असेल.
एवढंच नव्हे तर कोरोना मुक्त झालेल्या गावांना विकास काम सुद्धा मिळणार आहेत. कोरोना मुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 15 लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावाचे विविध 22 निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील राज्यातील सर्व गावांना सहभागी होता येणार आहे.