हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जगात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये पोलीस, डॉक्टर, सामान्य नागरिक, पत्रकार यांचा समावेश आहे. सध्या देशात दिवसाला साडे तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सध्या जगभरात कोरोनावर संशोधन सुरू आहे.
या संशोधनानुसार रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेकडून मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे.
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या लसीला परवानगी देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक लसींना देखील अशीच परवानगी देण्यात येईल अशी माहिती WHOकडून देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कित्येक महिन्यांनंतर शुक्रवारी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी दिली आहे.
भारत सध्या कोरोना महामारीचा सामना करत आहे. भारतामधील कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिला आहे. ब्रिटनकडून भारताला वैद्यकीय उपकरणे, सामग्री तसेच ऑक्सिजन फॅक्टरी पाठवण्यात येणार आहे. तर उत्तर आयर्लंडमधून ‘ऑक्सिजन उत्पादक’ पाठवण्यात येणार आहे. ब्रिटनकडून भारताला ४९५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, १२० नॉन-इनव्हेजिव व्हेंटिलेटर आणि २० मॅन्यूअल व्हेंटिलेटर पाठवण्यात आले आहेत.