हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय करोनाग्रस्त व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज उपचार घेत असलेल्या या करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेली व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी सकाळी त्यांचं निधन झालं.
देशात करोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या १२७ वर पोहोचली आहे.भारतात करोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या मृत्यूची नोंद कर्नाटकात झाली होती. कर्नाटकमध्ये ७९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.