कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला करोना व्हायरसशी लढण्यासाठी नेमकं काय करावं याबाबत दिलेलं मोठं उदाहरण म्हणावं लागेल
गेल्या १ महिन्यापासून दोन्ही कुटुंबातील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. गारगोटी येथील मंगल कार्यालयात मोठ्या थाटा माटात हे लग्न पार पडणार होतं. पण कोरोनाने भारतात प्रवेश केला आणि दोन्ही कुटुंबीयांच्या मोठ्या थाटात लग्न करायचं स्वप्न फक्त स्वप्नच राहील.. कारण केवळ 20 ते 25 जणांच्या उपस्थितीतच हा लग्न सोहळा पार पडण्याची यांच्यावर वेळ आली.. विशेष म्हणजे नवरदेव किरण शिंदे यांचं स्वतःचं मंगल कार्यालय आहे पण या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेत केवळ मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा उरकला.
हजारो लोकांच्या उपस्थितीची अनेक लग्न लावली मात्र केवळ 20 ते 25 नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा एकमेव लग्नसोहळा होता असे पुरोहितांनी म्हंटल. शेलार आणि शिंदे कुटुंबीयांनी मनावर दगड ठेऊन मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मतदारसंघातील आमदार प्रकाश आबीटकर यांनी या लग्नाला उपस्थिती लावली. दोन्ही कुटुंबीयांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांचं कौतुक करत नव वधू-वरांना आशीर्वाद दिलेत. शेलार आणि शिंदे कुटुंबीयांप्रमाणे प्रत्येकानं अशाच पद्धतीने सामाजिक भान राखत काम आपली जबाबदारी पार पाडली तर कोरोनारुपी संकटावर मात करण्यास मोठी मदत ठरू शकेल यात शंका नाही.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.