मुंबई । कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आता राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २२ तारखेला ठाकरे सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलना अंतर्गत घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यामातून ही घोषणा केली आहे.
करोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार २२ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन पाटील यांनी केलं.
घराच्याबाहेर उभं राहून हा निषेध नोंदवताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असंही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्राकडून आर्थिक पॅकेज मागणाऱ्यांनी राज्यातील जनतेसाठी अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. कोरोनाच संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केलं. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असं सांगतानाच ठाकरे सरकारचं अपयश आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”