नवी दिल्ली । कोरोनाचे संकट थांबायचे नाव घेत नाही. कोरोनावर मात करण्यासाठी उपाय-योजना करण्यात येत आहेत. मात्र, कोरोना संकटादरम्यान ५५ दिवसांच्या लॉकडाऊनंतरही संक्रमितांच्या आकड्यात सतत लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. देशात आता कोरोना बाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे एक लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातील ११ वा देश बनला आहे. कोरोनाचा फैलावर रोखण्यात अपयश येत असल्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारीपासून सुरुवात झाली आहे. असे असताना सोमवारी रात्री १० वाजेनंतर कोरोना बाधितांचा आकडा हा जवळपास १ लाख ३२८ च्या घरात पोहोचला आहे. ३९ हजार २३३ जण बरे झाले आहेत तर ३१५६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
१ लाखांचा टप्पा गाठलेले देश
जगातील करोनाबाधितांच्या आकड्यावर नजर टाकली असता, सर्वाधिक रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिका अजूनही आघाडीवर आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत १५ लाख ५० हजार २९४ रुग्ण आढळलेत तर ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रशियात २ लाख ९० हजार ६७८ रुग्ण आहेत तर २ हजार ७२२ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर स्पेन असून तेथे २७८२८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटन चौथ्या क्रमांकावर असून २५५३६८ लोकांना बाधा झाली असून १६,८५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाचव्या क्रमांकावर ब्राझील, सहाव्या क्रमांकावर इटली, फ्रान्स सातव्या क्रमांकावर, जर्मनी आठव्या, तुर्की नवव्या तर इराण दहाव्या क्रमांकावर आहे. तर भारत अकराव्या क्रमांकावर आहे. मात्र, ज्या देशातून याचा प्रसार झाला तो चीन मात्र, १३ व्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या ८२ हजार ९६० वर आहे. इथं ४ हजार ६३४ जणांनी आत्तापर्यंत प्राण गमावलेत. इथं ७८ हजार २४१ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. तर सध्या केवळ ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”